कोव्हीड सेंटरमध्येच कोविड रुग्णाची आत्महत्या
नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शासकीय कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
गणेश दिनकर करांडे वय ४० असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश या कोरोनाबाधित तरुणाने भेंडा येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भेंडा येथील ३ मजली नागेबाबा भक्त निवासमध्ये शासकीय कोविड सेंटर सुरु आहे. याठिकाणी सुमारे १९० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, या कोविड सेंटर मधील तिसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये २५ रुग्ण आहेत. मयत गणेश हा १८ एप्रिल रोजी कोविड सेंटरमध्ये एडमिट झाला होता. त्याची आई सुद्धा येथे एडमिट होती. गणेश व इतर सर्व रुग्ण दुपारी १२ वाजता जेवणासाठी खाली गेले मात्र गणेश एकटाच मागे थांबून राहिला. इतर सर्व जण आपले जेवण आटोपून बेडवर परतले. बराच वेळ झाला कोणी तरी तासाभरापासून बाथरूममध्ये गेला आहे. तो बाहेर येत नाही. आम्हाला बाथरुमला जायचे आहे अशी तक्रार इतर रुग्णांनी केल्यावर दुपारी १.४५ च्या सुमारास सफाई कामगाराने बाथरूमचा दरवाजा वाजविला. मात्र आतमधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतले तर हा प्रकार उघडकीस आला.
Web Title: Nevasa Covid patient commits suicide at Covid Center