अकोले तालुक्याची सांस्कृतिक ओळख विसरली जाते की काय?
अकोले (विद्याचंद्र सातपुते): अकोले तालुका हा क्रांतिकारी तालुका म्हणून ओळखला जातो.मात्र या तालुक्याची सांस्कृतिक ओळख विसरली जाते की काय? अशी शंका येत आहे.पूर्वी अकोले तालुक्यात नाट्य चळवळ ही जोरात चालू होती.अनेक नाट्य प्रयोग तालुक्यात होत असे.नाट्य कलावंतांनी राज्य पातळीवरील पारितोषिके मिळविली आहेत.राज्यस्तरीय एकाकिंका स्पर्धा भरविल्या जात असे या मधून त्यांच्या अभिनयाच्या जोरावर माजी प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, ऍड वसंत मनकर,लक्ष्मण आव्हाड,राजू अत्तार,डॉ उमा कुलकर्णी,डॉ उल्हास कुलकर्णी,सतीश मालवणकर, प्रदीप नवले,रवींद्र नवले,संदीप रसाळ,श्रीनिवास रेणूकदास,सुभाष खरबस, यांचे सारखे कितीतरी नाट्य व सिने कलावंत घडले गेले.प्रा.बी एम महाले यांचे सारखे नाट्य लेखकानी नाट्य सृष्टी गाजविली आहे. मात्र हे सध्या कुठे ही घडताना दिसत नाही.पूर्वी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकाकिंका होत असे,तीन अंकी नाटक होत असे,आता काही महाविद्यालयात चालू आहे.परन्तु ते पहाण्यास युवक थांबताना दिसत नाही.
अकोले महाविद्यालय येथील बुवासाहेब रंगमंच येथे अनेक प्रयोग होत असे.आता फक्त शाळा,महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनातून सुप्त गुणांना वाव मिळताना दिसत आहे.तेवढ्या पुरतेच सांस्कृतिक कार्यक्रम मर्यादित झाले आहे.तेही काय कमी नाही.किमान त्यामुळे तरी सांस्कृतिक चळवळ जीवनात आहे.धुमाळवाडीचे भूमिपुत्र मच्छीन्द्र धुमाळ हे सिने सृष्टीत चांगले नाव कमवत असून निर्मिती,दिगददर्शन या क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे.किशोर देशमुख,इंद्रभान कोल्हाळ,मंगेश खांबेकर ,बंडू शाळीग्राम या कलाकारांनी संगीत क्षेत्रात त्यांचे चांगले काम केले आहे. तालुक्यात चांगले नाट्यगृह नाही.त्यावर कोणीही चर्चा करायला तयार नाही.अजिंक्य कला व क्रीडा संवर्धन,अगस्ति रंगभूमी,लोकरंजन प्रतिष्ठान,अक्षय निकेतन,या संस्था उभ्या राहण्याचा प्रयत्न करीत होत्या परंतु त्यांना कोणताही राजाश्रय,लोकाश्रय मिळाला नाही.त्यामुळे त्या कोलमडून गेल्या आहेत.पूर्वी तिकीट लावून नाट्य प्रयोग बाहेरून आणले जात असे.आता त्यालाही पुढाकार घेण्यास पुढे धजत नाही.प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी सांस्कृतिक चळवळ उभी राहावी म्हणून अनेकांशी चर्चा करीत आहे.परन्तु किमान शहरात तरी त्याबाबत वैचारिक बैठक होणे गरजेचे आहे. त्यांचीही तयारी आहे.परंतु यासाठी तालुका पातळीवर चर्चा विनय सावंत यांनी नाट्यगृह उभारणीसाठी राष्ट्र सेवा दल प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते.परंतू त्यांचेही प्रयत्न कमी पडले. अकोले सांस्कृतिक महोत्सव होणे गरजेचे आहे.कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ असणे आवश्यक आहे.अकोले महोत्सव,नाट्य महोत्सव,पथनाट्य,
एकपात्री प्रयोग,गायन स्पर्धा,ऑर्केस्ट्रा,नृत्य स्पर्धा,व्याख्यानमाला,किर्तन महोत्सव,भजन स्पर्धा,विविध विषयांच्या परिषद,नाट्य,नृत्य,अभिनय,संगीत यांचे प्रशिक्षण शिबीर असे अनेक प्रयोग तालुक्यात होणे आवश्यक आहे.तालुक्याला सांस्कृतिक व्यासपीठ असेल तरच वैचारिक जडणघडण होणार आहे.त्यामधून संस्कार संस्कृती उदयास येणार आहे.अनेकांना विविध मार्ग सापडणार आहे,रोजगाराची निर्मिती होणार आहे.तालुक्याचे नाव राज्यपातळीवर होईल.या दृष्टीने जाणकार मंडळींनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Website Title: News Cultural identity of Akole taluka