Home संगमनेर प्रजासत्ताक दिनानिमित माजी विद्यार्थ्याची शाळेस भरघोस मदत….

प्रजासत्ताक दिनानिमित माजी विद्यार्थ्याची शाळेस भरघोस मदत….

संगमनेर (News): संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावात प्रजासत्ताक दिन धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर सन मार्च ९० च्या बॅचच्या  माजी ध्येयवेड्या विद्यार्थी मित्रांनी एकत्र येऊन श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मातृमंदिर उभारणीसाठी १३ लक्ष मदत देवून शाळेप्रती नतमस्तक झाल्याचा भावनिक प्रसंग घडला. या अनोख्या कार्यक्रमाचे पडद्यामागचे हिरो होते डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे.

       मागील वर्षी कर्मवीर जयंती निमित प्रमुख पाहुणे म्हणून ते गावातील कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. त्यावेळी शाळेच्या वतीने जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे नवीन इमारतसाठी माजी विद्यार्थीसमोर मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मार्च ९० च्या बॅच ने भरभरून प्रतिसाद दिला. या दिलेल्या रकमेत डॉक्टर बाबासाहेब गोडगे यांचा वाटा तब्बल ११ लक्ष रुपयाचा होता हे विशेष.

        डॉक्टर गोडगे यांनी  सन १९९८ मध्ये राजुर या आदिवासी दुर्गम भागात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी श्रीगणेशा केला व ते आदिवासी भागातील हजारो रुग्णांचे देवदूत बनले. गेले बावीस वर्ष ते २४ तास सेवा देत आहेत,हा ही त्यांचा विक्रमच आहे. मुळात अत्यंत काबाडकष्ट करणार्‍या ऊसतोड कामगार यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आई रोजाने कामाला जाणार तर वडील कधी ऊस तोड तर कधी मलेरिया खात्यात तात्पुरते फवारणीचे काम करायचे. या बिकट परिस्थतीत ते मोठे होत गेले. घरी लहान बहीण व एक भाऊ यांना सांभाळत सांभाळत गरीबीचे असंख्य चटके त्यांनी सोसले. हे तिघेही भावंडे एका कच्या घरात राहायचे. स्वताच स्वयंपाक करायचे. घरातील सर्व काम स्वता करायचे. रात्री आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळं व्हायचे परंतु पर्याय नसायचा. त्यामुळे गरीबी काय असते हे त्यांनी बालपणी अनुभवले होते. बालपणी कधी सामुदायिक कार्यक्रमात गेले तर गरीब म्हणून त्यांना हिणवले जायचे. बालपणीचा निखळ आनंद,निरागस जीवन त्यांना कधी मिळालेच नाही. समाजाकडून  झालेल्या उपेक्षेने त्यांचे मनात मात्र वेगळेच स्वप्न आकारास येत होते. अंधार्‍या रात्रीत त्यांना उद्याचा उषकाल दिसत होता.  कदाचित या सर्व अनुभव यांनीच ते प्रचंड ध्येयवादी बनले.

        गावातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. या काळात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा निर्माण झाला.त्यांच्या कमवा व शिका योजनेचे पाईक होण्याचे त्यांनी मनोमन ठरवले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी संगमनेर येथील ज्ञानमाता उच्च माध्यमिक विद्यालय येथे घेतले. अजूनही गरीबी पाठ सोडायला तयार नव्हती. बारावीनंतर डॉक्टर भानूदास डेरे यांच्या संपर्कात येऊन त्यांच्या मदतीने त्यांनी वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला. या काळात आई वडिलांनी वाट्टेल ते कष्ट घेऊन,पाहुणेरावळे यांच्याकडे मदतीची भीक मागून त्याचे शिक्षण पूर्ण करण्याचा चांग बांधला. डॉक्टर ला शिक्षणास मदत व्हावी म्हणून त्यांचा भाऊ काही काळ त्या महाविद्यालयात शिपाई म्हणून काम केले. तर डॉक्टर यांनी स्वता दिवसभर कॉलेज व संध्याकाळी एका मारवाडी यांच्या किराणा दुकानात सेल्समन चे काम केले. वाट्टेल ते झाले तरी चालेल,आता मला डॉक्टर बनायचे व माझे स्वप्न पूर्ण करायचे असा ध्यास त्यांनी घेतला होता.

      वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या खूप ओळखी नाही,आपल्याला कोणी मदत करणार नाही. त्यापेक्षा दूर आदिवासी भागात जाऊ अन तिथेच आरोग्यसेवा देवू असा निश्चय करून ते राजुर येथे आले. गाव अवर्षण भागात तर इथे प्रचंड पाऊस अशा कष्टदायक परिस्थितीशी झगडत झगडत त्यांनी २४ तास सेवा अशी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यासाठी स्वतच्या सर्व छंद,आवडी यांना फेकून दिले. आणि आज तब्बल २२ वर्षे ते न थकता अविरत काम करत आहे.

     आई ,वडील आपले कुटुंब व आपला समाज यांना ते कधी विसरले नाही. ज्या शाळेने आपल्याला मोठे केले,आपल्याला आत्मविश्वास दिला, स्वाभिमानाने जगायला शिकवले त्या माय माऊली शाळेस मात्र कधीही विसरायचे नाही असे ते नेहमी म्हणत. आता मात्र या कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाळेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यासाठी कदाचित या पेक्षा चांगली वेळ दुसरी नसणार आहे. आणि त्यांनी यासाठी आपल्या बॅच च्या सर्व मित्रांना एकत्रीत केले. नवीन इमारत झाली तर ती आपल्यासाठी अभिमान असणार आहे. गावातील दुर्लक्षित मुले तिथे चांगले शिक्षण घेऊ शकतील, या विचाराने त्यांनी चक्क ११ लक्ष रुपये व इतर मित्रांनी २ लक्ष असे एकुण १३ लक्ष रुपये देणगी देवून उपस्थितांची मने अभिमानाने भरून आली. गावकरी व विद्यार्थी यांच्यासमोर बोलताना त्यांनी प्रचंड मेहनत करा  व आपल्या आईवडिलांना विसरू नका असे भावनिक आवाहन केले. चार वर्षापूर्वी देखील त्यांनी मराठी शाळेस १ लक्ष रुपये देणगी  देणगी देवून आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी यासाठी मिळणार्‍या प्रेरणेचे सत्य सांगताना, प.पु.मुनिराज श्री.मुक्तिभूषण विजय म.सा यांचे मौलिक मार्गदर्शन व आशिर्वादाने असे काम करण्याची ऊर्जा मिळते तर धर्मपत्नी सौ. अनिता हिची सदैव साथ मला असते, असे आवर्जून सांगितले. 

       विशेष म्हणजे ही सर्व मदत यांनी आपली आई सखूबाई व वडील तुकाराम भानूदास गोडगे यांच्या हस्ते दिली. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड सर यांनी या मदतीचा स्वीकार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी बाळनाथ सोनवणे यांनी केले,त्यांनी देणगी देण्यामागची भूमिका मांडली तर याच बॅच चे सर्व मान्यवर देणगीदार विद्यार्थी कमरअली तांबोळी,संजय गडाख, सुदाम गोडगे,अनिल सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,बाबासाहेब माळी,रमेश आरोटे हे विद्यार्थी उपस्थित होते. या बॅच च्या वतीने हे निधि संकलन करण्याच्या कामात पोपट दिघे, संतोष रहाटळ यांनी देखील गेले महिनाभर मेहनत घेतली होती. कार्यक्रम संपला अन आता आपल्या बॅच ने देखील मदत करायची याची खूणगाठ मात्र सर्वांनी बांधली. सर्व विद्यार्थ्यांच्या चेह-यावर अभिमान ओसंडून वाहत होता. यावेळी रयत चे माजी निरीक्षक एन.एस.सोनवणे यांनी या सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here