Home अकोले अकोले तालुक्यातील शिक्षकांचा अनोखा उपक्रम.. कळस प्रदर्शनात लक्षवेधक सादरीकरण

अकोले तालुक्यातील शिक्षकांचा अनोखा उपक्रम.. कळस प्रदर्शनात लक्षवेधक सादरीकरण

अकोले, (News) :  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये राबवलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक उपक्रम समाजासमोर ठेवायच्या हेतूने तालुक्यातील शिक्षकांनी येथील कृषी प्रदर्शनात ‘आपली शाळा, मराठी शाळा’ हा स्टॉल मांडला होता. डिजिटल साधनांच्या मदतीने शिक्षकांनी आपल्या शाळांमधल्या विविधांगी उपक्रमांचे मोठ्या पडद्यावर व्हिडीओ डॉक्युमेंटरीज, मुलाखती, इंग्रजी शिकवण्यासाठी सुरु असलेले प्रयोग दाखवत लक्षवेधक सादरीकरण केले. मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा आशयाची प्रचार पत्रके चर्चेचा विषय ठरला. कळस प्रदर्शनास सुमारे दोन लाख नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. मराठी शाळांच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती.

गेल्या काही काळात मराठी शाळा आणि शिक्षकांची प्रतिमा वादविषय ठरली आहे. जन्मदर कमी झाल्याने पटसंख्या कमी होत गेली. शिक्षणाच्या माध्यमाबाबत साक्षरता नसल्याने, भपकेबाज वातावरणाला भुलून, कोणाचे तरी अनुकरण करत, आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालणाऱ्या पालकांची संख्या मोठी आहे. कारणं अनेक असली तरी पटसंख्या कमी होण्याला केवळ शिक्षकांना जबाबदार धरले गेले. या पृष्ठभूमीवर अकोले तालुक्यातील शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून ‘आपली शाळा मराठी शाळा’ ही प्रचार मोहीम हाती घेतली. ‘मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण अशी टॅगलाईन असलेली मोहीम शिक्षक नेटाने राबवत आहेत. बदललेल्या मराठी शाळांमधले विविध उपक्रम ठेवत त्यांना आश्वस्त करताना, पालकांना माध्यमसाक्षर करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे. शाळेत चांगले काम करणे पुरेसे नसून, केलेले काम समाजासमोर ठेवायची गरज लक्षात घेऊन तालुक्यातील धडपड्या वृत्तीच्या उपक्रमशील शिक्षकांनी ही चळवळ सुरु केली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत मराठी शाळांचा प्रचाररथ तालुक्यातील गावोगावी फिरला. त्यातून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून २४९ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले.

kalas exhibition
मराठी शाळांच्या दालनातले शैक्षणिक साहित्य आणि डॉक्युमेंटरी बघायला नागरिकांची गर्दी केली होती.

येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात प्रामुख्याने शेतीशी संबंधित उद्योग, कंपन्या, प्रयोगशील शेतकरी, बचत गट, व्यापारी यांची दालने असतात. मागील वर्षीपासून या प्रदर्शनात आपली शाळा, मराठी शाळा’ या दालनात मराठी शाळांचा जागर आणि गजर सुरु होता. मोठ्या पडद्यावर तालुक्यातील ५०हून अधिक शाळांमधल्या विशेष उपक्रमांचा समावेश असलेल्या, बदललेल्या जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक उपक्रमांच्या ध्वनीचित्रफिती दिवसभर दाखवल्या जात होत्या, नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मराठी शाळेत शिकताना खाडखाड इंग्रजी वाचणाऱ्या मुलांचे व्हिडीओ बघून नागरिकांनी शिक्षकांचे कौतुक केले. सगळ्या शाळांमध्ये असे घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. याखेरीज छापील प्रचारपत्रके वाटली जात होती, जिल्हा परिषदेने केलेल्या ‘काव्यरंग’सह मुलांचे बाल कवितासंग्रह, हस्तलिखिते, विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरातील वह्या ठेवलेल्या होत्या. शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी प्रसिद्ध उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब आरोटे यांनी स्वत: तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची माहिती नागरिक घेत होते. मातृभाषेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या तालुक्यातील मान्यवरांचे फोटो फ्लेक्सवर झळकत होते. मातृभाषेतून शिक्षणाचा शिक्षणशास्रीय विचार सांगणारे हे दालन लक्षवेधी ठरले. या उपक्रमाचा खर्च आजी माजी शिक्षकांनी केला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दालनाचे उदघाटन झाले. हा उपक्रम महत्त्वाचा असून याचे राज्यात अनुकरण होण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. बीजमाता राहिबाई पोपेरे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे सरव्यवस्थापक अमित रानडे, नगर विकास विभागातील अवरसचिव विजय चौधरी, आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू अप्पासाहेब ढूस, सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, महाउर्जाचे जोशी, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, शुभांगी जोंधळे, अन्वर शेख, वकील के. डी. धुमाळ, उद्योजक नितीन गोडसे, गटाशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, राजेश पावसे, जालिंदर खताळ, शंकर गाडेकर, बबन निघूते, गावोगावचे सरपंच, शालेय व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष आदींनी दालनाला भेटी दिल्या. उदघाटन समारंभात वीरगाव, हिवरगाव आंबरे आणि कळस येथील जिल्हा शाळांची झांज आणि लेझीम पथके लक्ष वेधत होती.

Website Title: News Teacher Attractive presentation of kalas exhibition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here