पहाटे डान्सबारवर छापा; ९ महिलांची सुटका, ३५ जण पोलिसांच्या ताब्यात
एका डान्सबारवर पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा (Raid) टाकला, अश्लील हावभावासह नृत्य करणाऱ्या ९ महिलांची सुटका, पोलिसांनी ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त.
धाराशिव | उमरगा: उमरगा शहरालगतच्या चौरस्त्यावरील एका डान्सबारवर पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला आहे. यावेळी अश्लील हावभावासह नृत्य करणाऱ्या ९ महिलांची सुटका करून त्यांच्यावर पैशांचे कूपन उधळणाऱ्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात ५८ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
उमरगा चौरस्ता येथून लातूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सौदागर हॉटेल आहे. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही परवानगी नसताना मोठ्या आवाजात गाणी लावून महिलांकरवी अश्लील नृत्य करवून घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार कळंब उपविभागाचे सहायक अधीक्षक एम. रमेश यांच्या पथकाने माहितीची खात्री करून शुक्रवारी पहाटे अचानक या डान्सबारवर छापा टाकला. यावेळी ९ महिला अश्लील हावभाव करीत गाण्यांवर बीभत्स नृत्य करीत असल्याचे दिसून आले. तसेच मोठ्या संख्येने जमलेले ग्राहक या महिलांवर पैशांचे कूपन उधळीत अश्लील नृत्य करताना आढळून आले.
पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत सर्व महिलांची सुटका केली. याप्रकरणी उमरगा ठाण्यात बारचालकासह एकूण ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७ कार, २९ मोबाइल, ४ दुचाकी जप्त सहायक अधीक्षक एम. रमेश यांनी केलेल्या या कारवाईत पथकाकडून या बारमधील आरोपींच्या सात कार, ४ दुचाकी, २९ मोबाइल व रोख असा तब्बल ५८ लाख ५१ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा सर्व मुद्देमाल उमरगा ठाण्यात दाखल करण्यात आला.
पैशांच्या बदल्यात मिळायचे कूपन
हॉटेलमध्ये नृत्य करणाच्या महिलांवर उधळण्यासाठी कूपन पद्धती अवलंबिण्यात येत होती. ग्राहकाने त्यांना हव्या तितक्या रकमेचे कूपन एका टेबलवरून मिळायचे. जितके रुपये भरले तितक्या किमतीचे प्रत्येकी १० रुपयांचे कूपन दिले जात होते. महिलांवर पैशांऐवजी हेच कूपन उधळले जात असल्याचे कारवाईत आढळून आले. हे कूपनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
Web Title: Raid the Dancebar 9 women released, 35 people in police custody
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App