Home अहमदनगर अहमदनगर: तीन दिवस पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचीही शक्यता

अहमदनगर: तीन दिवस पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचीही शक्यता

Breaking News | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल असे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता , प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना.

Rain warning for three days, possibility of thunderstorm with lightning

अहमदनगर: गेल्या १५ दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळांनी सर्वजण हैराण असतानाच आता हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात ७ ते ९ एप्रिल असे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून तीव्र उन्हाळा जाणवत आहे. जिल्ह्यात तापमान ४० अंशापर्यंत नोंदवले जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनाकडून १००च्या पुढे टँकर सुरू आहेत. त्यात दररोज वाढ होत आहे. अशातच आता हवामान खात्याने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ६ ते ८ एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भामध्ये ७ व ९ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. दरम्यान, दोन दिवसांपासून उकाडा जाणवत आहे.

नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिलनंतर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अवकाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित

ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल यांच्यापासून दूर राहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. अधांतरी लटकणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, असेही सूचनांमध्ये म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी घ्यावी ही काळजी

अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे. शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सध्या काही भागात कांद्याची काढणी सुरू आहे. त्यामुळे त्यांनीही खबरदारी घ्यावी.

Web Title: Rain warning for three days, possibility of thunderstorm with lightning

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here