धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार, घरोब्याचे संबंध नडले
Jalgaon Rape Case: तरुणीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जळगाव : चाकूचा धाक दाखवून २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. विनोद सुकलाल भोळे (रा. सदोबा नगर, जळगाव) याच्याविरुद्ध मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत ही घटना घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका महाविद्यालय पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पंधरा दिवसापूर्वीच आईचे आजारपणामुळे निधन झाले. वडील एका ठिकाणी कामाला आहेत. १ सप्टेंबर रोजी वडिलांची रात्रपाळी ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते तर पीडिता एकटीच घरी होती. विनोद भोळे याच्याशी पीडित कुटुंबाचे घरोब्याचे संबंध असल्याने येणंजाणं सुरु होते. या काळात त्याची पत्नी व दोन मुलं गावाला गेलेले होते. त्यामुळे पीडितेकडून त्याला जेवणाचा डबा मिळत होता.
१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता भोळे हा पीडितेच्या घरी गेला. दरवाजा उघडायला लावला. घरात आल्यावर चाकूचा धाक दाखवून बाहेर निर्मनुष्यस्थळी घेऊन गेला. तेथे अंधार असल्याने तेथून तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला. घरात दोन वेळा त्याने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर एक तासाने तरुणीची सुटका केली. यावेळी त्याने डाव्या हातावर चाकू मारल्याने दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तरुणीने मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Rape News girl was assaulted by threatening her with a knife