वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ८ वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
संगमनेर: वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ८ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडली.
घरासमोरील शेतात गुंडाळून ठेवलेल्या तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने या ठिकाणी खेळत असलेल्या ८ वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त गावकऱ्यांनी करून संबंधितावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
निमगाव पागा येथील शेतकरी प्रवीण मुरलीधर कानवडे यांच्या शेतात हा प्रकार घडला. कानवडे यांचा भाचा आर्यन योगेश गायकर याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले प्रवीण कानवडे यावेळी जखमी झाले. आर्यन हा मुळचा डोंबिवली येथे राहत असून तो मामा घरी चार महिन्यापासून निमगाव पागा येथे राहत होता.
या घटनेची माहिती समजताच कुटुंब व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमी मामा व बालकाला उपचारासाठी संगमनेर येथे हलविले. मात्र मुलाचा मृत्यू झाला. याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बालकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
Web Title: Sangamner News 8-year-old dies after electric shock