संगमनेर पोलिसांनी अवैध दारु व गांजा पकडला
Breaking News | Sangamner: दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांवर कारवाई करुन १२ हजार १८० रुपयांची देशी दारु आणि ९ हजार रुपयांचा ९८० ग्रॅम गांजा जप्त.
संगमनेर: शहर पोलिसांच्या – पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांवर कारवाई करुन १२ हजार १८० रुपयांची देशी दारु आणि ९ हजार रुपयांचा ९८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पहिली कारवाई गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वेल्हाळे शिवारात केली. येथील हॉटेल राजमहलच्या आडोशाला दशरथ विठ्ठल डुबे (वय ६४, रा. पेमगिरी, ह. रा. हॉटेल राजमहल) हा वृद्ध व्यक्ती देशी दारुची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून १२ हजार १८० रुपयांची दारू जप्त केली आहे.
याप्रकरणी पोकॉ. हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ डुबे याच्यावर गुरनं. १६८/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरी कारवाई शहरातील शिवाजीनगरमधील वैदूवाडी येथे केली. यावेळी प्रशांत पोपट घेगडमल (वय २६, रा. हिवरगाव पावसा, ह. रा. कासारा दुमाला) यांच्याकडे ९८० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त करून पोकॉ. रोहिदास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत घेगडमल याच्यावर गुरनं. १७२/२०२४ अंमली औषधी द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे पोहेकॉ. गणेश सोनवणे आणि उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.
Web Title: Sangamner police seized illegal liquor and ganja
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study