संगमनेर: कारच्या धडकेत मजुराचा मृत्यु
संगमनेर | Accident News: संगमनेर पठार भागातील रणखांब येथे जात असलेल्या बोअरवेल वाहनावरील मजुराला लघुशंका आल्याने चालकाने गाडी रस्त्यालगत थांबवून रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असताना वेगात आलेल्या कारने मजुराला जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. भगवान सदाशिव चौकल्ले वय ५५ रा, लोहा जि. नांदेड असे या मयत मजुराचे नाव आहे.
घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान सदाशिव चौकल्ले हे बोअरवेलच्या वाहनावर मजूर म्हणून काम करतात. संगमनेर येथून बोअरवेलची गाडी साकुर फाटामार्गे शुक्रवारी पहाटे रणखांबकडे जात असताना चौकल्ले यांना लघुशंका आल्याने चालकाने गाडी रणखांब ते कौठे मलकापूर रस्त्यालगत थांबविली. चौकल्ले हे रस्त्याच्या कडेला लघु शंका करत असताना कारच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता कार भरधाव वेगात चालवून भगवान चौकल्ले यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.
याप्रकरणी मनमथ बाबुराव वड्डे ता, लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहे.
Web Title: Sangamner Worker killed in car Accident