Nashik News: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना बनावट दस्तऐवज आणि बँकेची फसवणूक प्रकरणात पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतले.
नाशिक: नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना बनावट दस्तऐवज आणि बँकेची फसवणूक प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या हिरेंना अटक करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.
“शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांची अटक हे राजकीय दबाव तंत्र आहे. नाशिक जिल्हा बँकेचे 7 कोटी रुपयांचे हे कर्ज प्रकरण. गिरना मौसम साखर कारखान्याचे 178 कोटीच्या अफरातफर प्रकरणात मंत्री दादा भुसे अडकले पण कारवाई नाही. भीमा पाटस साखर कारखाना दौंड येथे 500 कोटींची मनी लॉंन्ड्रिंग. पण भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर कारवाई नाही…” असे संजय राऊत यांनी म्हणले आहे.
तसेच “मंत्री मंडळात अनेक भ्रष्ट लोक जामिनावर आहेत. सहकारी बँकाचे अनेक थकबाकीदार सरकारात आहेत. अद्वय हिरे यांनी मालेगावात सक्रिय राहू नये. मालेगाव विधानसभा निवडणुक लढू नये यासाठी राजकीय दबाव होता. हिरे झुकले नाहीत.त्यांना अटक झाली. शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे,” असे म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, अद्वय हिरे यांच्या अटकेनंतर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्या दबावामुळेच ही कारवाई झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मालेगाव बाजार समितीत हिरे यांच्या पॅनेलने भुसे यांच्या पॅनलचा पराभव केला होता. त्यानंतर हिरे आणि दादा भुसे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title: Senior leader of Shiv Sena Thackeray group arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App