Home अहमदनगर जिल्ह्यातील या शहरातील नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता

जिल्ह्यातील या शहरातील नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता

Shirdi Nagar Panchayat Election 2021

शिर्डी | Nagar Panchayat Election 2021: शिर्डीत नगर पंचायतऐवजी नगरपालिका करा अशी शिर्डीकरांची मागणी आहे. शिर्डी नगरपंचायत २०१ सार्वत्रिक निवडणुकीवर सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्यासाठी बैठक घेऊन प्रक्रिया सुरु केली असून याबाबत सर्वपक्षीय ग्रामस्थांचा निर्णय झालेला नाही.

शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिर्डी शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याअनुषंगाने सन २०१६ मध्ये नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन नगरपरिषद करण्यासंदर्भात निकाल झाला होता. परंतु त्यावर शासनाकडून अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.

सध्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली प्रभाग रचना चुकीची व अयोग्य असून मतदार यादीत सुद्धा गोंधळ असल्याचा आरोप या बैठकीत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मागासवर्गीय बहुल अर्थात जास्त मतदार संख्या असलेल्या प्रभागात सर्वसाधारण आरक्षण पडलेले आहे. तर मागासवर्गीय मतदार संख्या अत्यल्प व सर्वसाधारण मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी राखीव संवर्गाचे आरक्षण पडले आहे. हा विरोधाभास असून त्यामुळे त्या-त्या प्रवर्गाच्या उमेदवारांवर अप्रत्यक्ष अन्याय झाल्याची भावना या बैठकीत काही ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे.

अनेक प्रभागात मतदारांची अदलाबदल झालेली दिसून येत असून मोठ्या संख्येने बोगस मतदार असल्याची शक्यताही काहींनी वर्तविली.त्याचा शोध घेऊन बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावी ही अनेकांची मागणी आहे. जोपर्यंत शासन शिर्डी नगरपंचायतची शिर्डी नगरपरिषद होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल करणार नाही अशी भूमिका यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतल्या असून नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद झाल्यानंतर शिर्डी शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अधिकचा निधी मिळेल तसेच नगरसेवक पदांच्या संख्येतही वाढ होईल, त्याचा प्रभागातील विकास साधण्यासाठी सुद्धा फायदा होईल. अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा त्यामुळे संधी मिळेल त्याकरिता सर्वानुमते बहिष्कार टाकून नामनिर्देशन पत्र दाखल न करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती इच्छुक उमेदवार व ग्रामस्थांना देऊन याबाबत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.

याविषयावर आज अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्वानुमते जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Shirdi Nagar Panchayat Election 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here