लोणीत शिवशाही बस व स्कुल बसचा अपघात, शिवशाहीच्या चालकाला….
Ahmednagar News: लोणी खुर्द गावातील बाभळेश्वर रस्त्यावर शिवशाही व स्कुल बसचा बुधवारी दुपारी अपघात (Accident).
लोणी: राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील बाभळेश्वर रस्त्यावर शिवशाही व स्कुल बसचा बुधवारी दुपारी अपघात झाला. मात्र या भीषण अपघातात विद्यार्थी व प्रवाशी दैव बलवत्तर म्हणून बचावले.
याबाबतची घटना अशी, राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस एमपी 09 ईएम 1980 बाभळेश्वरकडून लोणीमार्गे पुण्याकडे जात होती. लोणी खुर्द गावातील प्रिन्स चौकातून लोणी येथील लिटिल फ्लावर स्कुलची बस विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्यासाठी लोणी खुर्द गावातून पीपीएस रस्त्याने तिसगाववाडीकडे जात होती.
बुधवारी दुपारी 12.50 वाजण्याच्या सुमारास रस्ता मोकळा असल्याने स्कुल बसच्या चालकाने बस चौक ओलांडण्यासाठी पुढे नेली. तेवढ्यात बाभळेश्वर रस्त्याने शिवशाही बस भरधाव वेगाने आली. समोर एक टँकर जात होता. चौकात मोठे गतिरोधक असताना त्याकडे दुर्लक्ष करून शिवशाहीच्या चालकाने बस पुढे नेली आणि ती स्कुल बसवर जोराने धडकली.
विद्यार्थी आणि प्रवाशी घाबरून आरडाओरड करू लागले. स्थानिक नागरिक मदतीला धावले. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र प्रवास करणारे प्रवासी सुदैवाने सुखरूप बचावले. चौकात गतिरोधक नसता तर हा भीषण अपघात घडला असता. शिवशाहीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. एकही विद्यार्थ्याला साधे खरचटले सुद्धा नाही. यामुळे पालक आणि शाळेच्या व्यवस्थापनाची चिंता दूर झाली.
Web Title: Shivshahi bus and school bus accident in Loni
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App