धक्कादायक: समुद्रकिनाऱ्यावर सहा जण बुडाले
पालघर: पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनाऱ्यावर सहा जण बुडाल्याची (drowned) धक्कादायक घटना घडली आहे. यामधील दोघे जण बचावले असून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
समुद्रात पोहण्यासाठी गेलेले दोन स्थानिक मुले बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी नाशिकच्या चारही तरुणांनी समुद्रात उड्या मारल्या. मात्र, अंदाज न आल्याने चौघेही बुडाले आहेत. यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो वाचला असून तर एका स्थानिक मुलाला वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळाली आहे.
ओम विसपुते (नाशिक), दीपक वडाकाते (नाशिक), कृष्णा शेलार (, नाशिक)अथर्व नागरे (केळवे) अशी मयत मुलांची नावे आहेत.
पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर नाशिकमधील एका महाविद्यालयातील कॉलेज तरुणांनी सहल आयोजित केली होती. यावेळी दोन स्थानिक लहान मुले पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. मात्र समुद्राला ओहोटी असल्याने ही मुले बुडू लागली.
नाशिकच्या या तरुणांचे लक्ष या मुलांकडे गेले असता त्यांनी तात्काळ त्या लहान मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, हे चौघेही पाण्यात बुडाले. या चौघांपैकी एक तरुण पोहणारा असल्यामुळे तो बचावला. तर बुडणाऱ्या एका लहान मुलालाही वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक नागरिकांनी या मुलांचा शोध घेतला असता चारही मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहेत. वाचलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Six people drowned on the beach