पारंपारिक व छोट्या व्यवसायाला कोरोनाचे नियम पाळून उघडण्यास परवानगी द्या
बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार, एसबीसी, भटक्या विमुक्तांसाठी आर्थिक पॅकेज जाहिर करा – भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीस संघर्ष महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष- अंकुश वाकचौरे (Ankush Wakchaure)
अकोले: महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे व्यापार, उद्योग पुर्णत: कोलमडून जात आहेत. समाजातील सर्व छोटे घटक, हातावर पोट असणारे लहान मोठे व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत बाराबलुतेदार व आठरा आलुतेदार, एसबीसी, भटक्याविमुक्त या समाजातील अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ लागली असून या समाजातील सर्वांसाठी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासन आर्थिक पॅकेज जाहीर करणार का? असा सवाल प्रसिध्दी पत्रकाद्वारे भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीस संघर्ष महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश वाकचौरे यांनी केला आहे.
गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार, एसबीसी, भटक्या विमुक्त समाजातील उद्योग-धंद्यांचे प्रचंड हाल झाले असून शासनाने तात्काळ या वर्गासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावेअशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. लॉकडाऊन पार्श्वभूमीवर देण्यात येणा-या आर्थिक पॅकेज मध्ये बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार बांधवांचा समावेश करावा, पूर्वी ग्रामीण भागात वस्तुविनिमय पद्धत होती. या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. शेतकरी धान्य पिकवत असे आणि जेशेतकरी नव्हते ते शेतकऱ्यांस व इतरांना इतर सेवा पुरवीत. यामध्ये जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवित त्यांना अलुतेदार तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार असे म्हटले जात. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्या न पिढ्या तेच ठरावीक काम करीत. बारा बलुतेदारांमध्ये कुंभार, कोळी, गुरव, चांभार,मातंग, तेली, न्हावी, परीट, माळी, महार, लोहार, सुतार या वर्गांचा समावेश होता. हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमध्येही बारा बलुतेदारांचा अंतर्भाव होता. त्यात आतार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी नदाफ, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन,मिसगर, शिकलगार आदी बारा जातींचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर बाजारपेठा हळूहळू सुरू होतील. मात्र, रोटीच बंद झालेल्या गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदारांच्या घरच्या चुलीच खरा प्रश्न आहे तसेच भटक्या समाजाचे देखील प्रचंड प्रमाणात हाल होत असून यामध्ये कैकाडी, वासुदेव, गोसावी, बेलदार, गोंधळी, गोपाळ, मसनजोगी, गवळी आदींचा समावेश आहे. बलुतेदारांपैकी शहरात आणि गाव खेड्यातील साळी, माळी, तेली, कुंभार, न्हावी,चांभार, शिंपी, सोनार, भोई, कोळी, भावसार, रंगारी, जंगम, धोबी, सुतार, लोहार, गवंडी या पारंपारिक व्यावसायिकांची दैना उडाली असून वरील सर्व विशेषतः हातावर पोट भरणाऱ्या आहे. बलुतेदारांपैकी न्हावी, भोई, शिंपी, भावसार, चांभार,परीट यांना मोठा फटका बसला आहे. सलुन व्यावसायीक, टेलरींग कारागीर, परीट, सुतार,लोहार, टोपली, केरसुणी तयार करून गावोगावविक्री करणारे मातंग बांधव, चप्पल-बुट सांधणारे गटई कामगार, खारीमुरी फुटाणे विकणारा भोई समाज, कोळी, कुंभार, सुवर्ण कारागीर आणि गावोगाव फिरून फुले जमवून हार आणि गुच्छ बनविणारे माळी बांधव, मंदिराची देखभाल करणारे गुरव बांधव, फळे विकून उपजिविका करणारे बागवान, गावोगावी गल्ली बोळात बांगड्या विकणारे मनियार, कासार समाज, गाद्या, दुलई तयार करणारेपिंजारी, यंत्रमागावर विणकाम करणारे जुलाहा(साळी), कोष्टी बांधवांचे लॉकडाऊनने अक्षरश:कंबरडेच मोडले आहे. आर्थिक पॅकेज देताना रोटी बरोबरच या सर्वांच्या रोजीचा ही एकत्रित विचारशासनाने करावा असेही वाकचौरे यांनी म्हटले आहे. पारंपारिक व्यवसायाला कोरोनाचे नियम पाळून उघडण्यास परवानगी द्यावी आताच काही महिन्यांपूर्वीच तर काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू झाले होते. तरीही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणि भांडवलाची जुळवाजुळव करायला बराच वेळ लागेल असे वाटले होते. परंतू पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाला नाविलाजाने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे. या सर्वच घटकांना पुन्हा मूळ प्रवाहात आणून त्यांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी शासनाने मोठे आर्थिक पॅकेज द्यावे. तसेच बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, एसबीसी, भटक्या विमुक्तांचे पारंपारिक, छोट्या व्यवसायांना कोरोनाचे नियम पाळून उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.
Web Title: Small businesses to open by following the rules of the corona Ankush Wakchaure