संगमनेरमध्ये दगडफेक-गाड्यांची तोडफोड, समनापूरचे प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा म्हणाले…
Sangamner News: संगमनेर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या भगव्या मोर्चानंतर समनापूर गावात दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार, समनापूरमधील प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा यांची प्रतिक्रिया.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या भगव्या मोर्चानंतर समनापूर गावात दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला. यानंतर धार्मिक तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर पोलिसांनी पोलीस बळाची तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावर आता आपल्या खास शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या समनापूरमधील प्रसिद्ध वडापाववाले अन्सार चाचा यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच तोडफोड, दगडफेक करणारे कोण आहेत हे सांगितलं. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
अन्सार चाचा म्हणाले, “खूप चांगलं राहिलं पाहिजे. प्रचंड प्रेमाने राहिलं पाहिजे. महाप्रचंड प्रेमाने राहिलं पाहिजे. भाडणं करून, दगडफेक करून काहीही साध्य होणार नाही. ते आपल्या देशाचंच नुकसान आहे, हे विसरून चालणार नाही. सगळी माणसं गुण्यागोविंदाने, प्रचंड प्रेमाने राहिले तर अशा भानगडी उद्धवणार नाही. त्यामुळे माझं प्रत्येक गाववाल्याला सांगणं आहे की, कोणतंही भांडण करू नका.”
“लोकांनी प्रचंड प्रेमाने रहावं हीच अपेक्षा आहे. आजचं भांडण आमच्या गावातील एकाही माणसाने केलेलं नाही. जे रोडवरून जात होते त्यांनी हे भांडण केलं. पोलिसांकडे भांडणं करणाऱ्यांचे फोटो आले आहेत. ते पुढील कारवाई करणार आहेत,” अशी माहिती अन्सार चाचांनी दिली.
“माझी हात जोडून लोकांना प्रचंड प्रेमाने विनंती आहे की, मायबाप भांडणं करू नका. महाप्रचंड वेगाने शांत व्हा. चांगल्याप्रकारे रहा हीच अपेक्षा आहे,” असं म्हणत अन्सार चाचांनी त्यांच्या खास शैलीत शांततेचं आवाहन केलं. दरम्यान या मारहाणीच्या प्रकारातील १७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Stone pelting vandalism in Sangamner
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App