Home अहमदनगर Suicide: विवाहितेची आत्महत्या, दोन लाखाची केली होती मागणी

Suicide: विवाहितेची आत्महत्या, दोन लाखाची केली होती मागणी

Suicide of a married woman, two lakh was demanded

Ahmednagar | Pathardi | पाथर्डी:  गाडी घेण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये आणावेत म्हणुन वेळोवेळी शारिरीक व मानसिक होणारा छळ सहन न झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.  पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ही घटना घडली आहे. तेजश्री धिरज रांधवणे असे मयत विवाहितेचे नाव आहे. तेजश्री हिला नऊ महिन्याचा एक मुलगा आहे.

याबाबत विवाहितेचे वडील आदिनाथ बाळदेव केळकर (रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली असून दिलेल्या फियादीवरुन विवाहितेचा पती धिरज बाबासाहेब रांधवणे, मुलीचे सासरे बाबासाहेब फकडराव रांधवणे, मुलीची सासू सुनीता बाबासाहेब रांधवणे, दिर सुरज बाबासाहेब रांधवणे (सर्व रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजश्री हिचा विवाह १३ ऑगस्ट २०२० रोजी तिसगाव येथील धिरज बाबासाहेब रांधवणे याच्या सोबत झाला होता. आदिनाथ केळकर यांनी लग्नात बारा तोळे सोने व तसेच इतर मानपान देवून मुलगी तेजश्री हिचे लग्न करुन दिले होते. सुरुवातीच्या काळात मुलगी तेजश्री हिस सासरच्या लोकांनी चांगले नांदवले. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये कार घेण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये आणावेत म्हणुन तेजश्री हिच्याकडे मागणी करु लागले. यावर मुलीच्या वडीलांनी सध्या पैसे नाहीत नंतर देईन असे सांगितले.

पैसे दिले नाही म्हणुन तेजश्री हिचा सासरचे लोक शारीरीक व मानसिक छळ करू लागले तसेच तिला त्रास देवू लागले. या त्रासाबाबत तेजश्री वेळोवेळी फोन करुन सांगत होती. मात्र आता तुला मुलगा झाला असून आज ना उद्या पती व सासरचे लोक नीट वागवतील या दृष्टीने तेजश्री नांदत होती. आज ना उद्या मुलीचे चांगले होईल या दृष्टीने जावई व तिचे घरातील लोकांना काही एक बोलत नव्हते. मात्र सासरचे लोक तेजश्री हिचा शारिरीक व मानसिक छळ करून तुला तुझ्या मुलाला सांभाळता येत नाही. तुझ्या दुधाची त्याला गरज नाही. तुला स्वयंपाक येत नाही, असे म्हणत तिला त्रास देवू लागले. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता तेजश्री हिने शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

या प्रकरणी तेजश्रीचे वडील आदिनाथ केळकर यांच्या फिर्यादीवरून पती धिरज बाबासाहेब रांधवणे, सासरे बाबासाहेब फकडराव रांधवणे उर्फ गोटया, सासू सुनीता बाबासाहेब रांधवणे, दीर बाबासाहेब रांधवणे (सर्व रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ बी, ४९८ ए, ३४ प्रमाणे गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suicide of a married woman, two lakh was demanded

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here