Home महाराष्ट्र फुले काढताना एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्याने मृत्यू

फुले काढताना एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्याने मृत्यू

Electric Shock: तिघांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू.

Three of the same family died due to electric shock

कऱ्हाड: फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला आहे. तिघांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. तासवडे, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मृतांमध्ये माय लेकरासह संबंधित महिलेच्या दिराचा समावेश आहे.

हिंदुराव मारुती शिंदे (वय ५८), सीमा सदाशिव शिंदे (४८), शुभम सदाशिव शिंदे (२३), अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर नीलेश शंकर शिंदे (२५) व विनोद पांडुरंग शिंदे (४०) या जखमीवर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे येथे शिंदे वस्तीवर रघुनाथ जाधव यांची विहीर आहे. या विहिरीवर वीज कनेक्शन आहे. या परिसरात आणखी एक नवीन वीज वाहिनी जोडण्यात आली आहे. या विहिरीच्या परिसरातच फुलांची झाडे असून, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हिंदूराव शिंदे, त्यांची भावजय सीमा शिंदे व पुतण्या शुभम हे फुले तोडण्यासाठी गेले होते. फुले तोडत असताना अचानक शुभमला शॉक लागून तो विहिरीत फेकला गेला. नजीकच असलेल्या सीमा व हिंदूराव यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर शुभमच्या मदतीसाठी त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जोरदार शॉक लागून तेसुद्धा विहिरीत फेकले गेले.

एकाचवेळी तिघेजण विहिरीत कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. या आवाजामुळे नीलेश शिंदे व विनोट शिंदे हे त्या ठिकाणी धावले. त्यांनाही विजेचा शॉक लागून ते गंभीर जखमी झाले. या आरडाओरडामुळे परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. माहिती प्रशासनाला देण्यात आली. गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पोलीस दलही दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना कराडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Three of the same family died due to electric shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here