अहमदनगर: मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप
Husband Killed Wife: किरकोळ कारणातून पत्नीला चाकूने गळा व पोटावर वार करून ठार केल्याप्रकरणी आरोपी जन्मठेप. (Ahmednagar News).
अहमदनगर: किरकोळ कारणातून पत्नीला चाकूने गळा व पोटावर वार करून ठार केल्याप्रकरणी आरोपी राहुल सुरेश भोसले (वय ३३, रा. अजंठानगर, चिंचवड, पुणे) याला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी दोषी धरीत जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
सदर घटना राशीन (ता. कर्जत) येथील आहे. या प्रकरणातील माहिती अशी की, आरोपी राहुल भोसले हा २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पत्नी दीपाली हिला भेटण्यासाठी राशीन येथे आला होता.भेट झाल्यावर त्याने दीपाली हिस मोबाईल मागितला, परंतु तिच्याकडे त्याचा मोबाईल नसल्याने त्याने तिला एक चापट मारतानाच त्याच्याजवळील चाकूने दीपालीच्या गळ्यावर वार करून तिला जखमी केले. त्या अवस्थेत ती जमिनीवर पडली. त्यावेळी तिची बहीण दीपालीला वाचवण्यासाठी गेली असता तिच्यावर आरोपीने वार करून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मयत दीपाली हिला दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच ती मयत झाली.
सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुध्द पोलिस निरीक्षक सतीश गावित व डी. एस. मुंडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी व पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संगीता ढगे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी अभियोक्त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
Web Title: Wife killed for not giving mobile phone, husband sentenced to life imprisonment
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study