कार झाडावर आदळून शिर्डी येथील चालकासह महिला ठार
शिर्डी येथून तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात (Accident).
आष्टी: शिर्डी येथून तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकासह एक महिला असे दोघे ठार झाले, तर या महिलेची दोन मुले गंभीर जखमी झाली. मंगळवारी सकाळी ११:०० च्या सुमारास तालुक्यातील पोखरी गावाजवळ हा अपघात झाला.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कारमधून प्रवास करणारे कुटुंब शिर्डी येथील असून, तुळजापूर येथे दर्शनासाठी कारने जात होते. आष्टी तालुक्यातील पोखरी गावाजवळ चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटल्याने कार (क्र. एमएच ०३ बीसी ६७३६) रस्त्याच्या कडेला असलेल्या जांभळीच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात अनिता राहुल इंगोले (वय ३३) व चालक रुपेश बबन भेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले भावंड अनुप राहुल इंगोले (वय १४) व अभय राहुल इंगोले (वय १२) यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी अहमदनगर व जामखेड येथील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
अपघात होताच परिसरातील तरुण, नागरिकांनी मदतकार्य केले. आष्टी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोह. काळे, पोलिस बब्रुवान वाणी, चालक कन्हेरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी मदत केली. घटनास्थळाचा पंचनामा करत चालक व महिलेचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
Web Title: A woman along with the driver of Shirdi were killed when their car hit a tree Accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App