Sangamner News: तरुणाने वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना.
संगमनेर: जमविलेले लग्न मोडल्याने तालुक्यातील कोल्हेवाडी येथे राहणार्या तरुणाने वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या दहशतीमुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. याप्रकरणी तरूणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नितीन सीताराम खुळे (वय 32, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह तालुक्यातील वडगावपान शिवारात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
नितीन खुळे याच्या मृत्यूस गावातील काही प्रतिष्ठीत नागरीक कारणीभूत असल्याचा आरोप मयत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात नितीन खुळे याला बोलावुन घेऊन दमदाटी केली. दमदाटी करणारे ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी नसतानाही ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करतात. आपल्या भावाच्या मृत्युला कारणीभूत असणार्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मयत युवकाच्या नातेवाईकांनी दिला आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांना त्यांनी निवेदन दिले आहे.
संगमनेर कॉटेज रुग्णालयात सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मयत नितीन खुळे याचा मोबाईल व त्याच्याजवळ मिळून आलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीमध्ये गावातील अनेक प्रतिष्ठीतांची नावे आहेत. ज्यांच्या त्रासामुळे नितीन याने आत्महत्या केली आहे, असे मयताच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
याबाबत संजय तुकाराम खुळे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीत म्हटले आहे की, नितीन खुळे यास लग्नासाठी मुलगी बघितली होती. तिच्याबरोबर लग्न करण्याचे ठरले होते. मात्र मुलीच्या घरच्यांनी नंतर लग्न मोडले असे कळविले. सदर मुलीचे लग्न हे संदीप शिवाजी दिघे याचे बरोबर होणार असल्याचे कळाल्याने नितीन यास राग आला. त्याने संदीप यास शिवीगाळ केली. त्यानंतर नितीन यास ग्रामपंचायतीमधून फोन आला. त्याला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून घेण्यात आले.
त्यावेळी नितीन यास अमोल अप्पासाहेब दिघे, राजेंद्र देवराम दिघे, जालिंदर मच्छिंद्र दिघे, राहुल भास्कर दिघे, सुधाकर बलसाने यांनी बोलावून दमदाटी केली. थोड्या वेळात नितीन ग्रामपंचायतीबाहेर रडत आला. त्यानंतर त्याची समजूत काढून त्याला घरी पाठवून दिले. संजय खुळे हे देखील कामावर निघून गेले. त्यानंतर घरी येत असताना गावातील कुणीतरी व्यक्तीने संजय खुळे यांना सांगितले की, तुझ्या भावाने आत्महत्या केली आहे. नितीन याने कानिफनाथ जंगलातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे समजले. त्याच्याकडे एक डायरी सापडली. त्यात त्याने आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांची नावे डायरीत लिहीलेले होते.
याबाबत संजय तुकाराम खुळे याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 600/2023 भारतीय दंड संहिता 306, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहे.
Web Title: A young man commits suicide due to marriage breakup
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App