अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, तरुणाची कारवाईची मागणी
Ahmednagar Death: शेवगाव तालुक्यातील प्रकार : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, मुलीच्या नातेवाइकांनी एका तरुणास जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्यापासून संरक्षण हवे आहे, अशी मागणी तरुणाने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेवगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलगी शाळेत शिकत होती. तिची शेजारच्या गावातील तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ही बाब मुलींच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तरुणाला घरी बोलावून घेत धमकी दिली. त्यानंतरही हे दोघे फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. मुलीने तरुणासोबत लग्न करून देण्याचा आग्रह नातेवाइकांकडे धरला होता. तसे तिने फोनवरून तरुणाला सांगितलेही होते. एक दिवस तिचा फोन आला होता. त्यानंतर मुलीचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत संबंधित तरुणाने शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु कुणाचीही तक्रार नाही, अशी सबब देत पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. दोषींवर कारवाई करण्याची मागणी तरुणाने केली आहे.
अपर पोलीस अधीक्षकांचीही घेतली होती भेट
यासंदर्भात तरुणाने अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यांनी शेवगाव पोलिसांना फोनवरून कारवाई करण्याचा आदेश दिला होता; परंतु प्रकरण पुढे सरकले नाही. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची बदली झाली.
Web Title: Suspicious death of minor girl, youth demands action