Home अकोले Adhala Dam: आढळा धरण ओव्हर फ्लो,  लाभ क्षेत्रात आनंदाचे वातावरण

Adhala Dam: आढळा धरण ओव्हर फ्लो,  लाभ क्षेत्रात आनंदाचे वातावरण

Adhala Dam Akole overflow

अकोले | Adhala Dam:  भंडारदरा, भोजपूर् ही धरणे भरल्यानंतर अकोले,संगमनेर व सिन्नर या तीन(३) तालुक्यांसाठी वरदान ठरलेले आढळा धरणही आज दुपारी ओव्हर फ्लो झाले.त्यामुळे लाभ क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये उगम पावणाऱ्या प्रवरा,म्हाळुंगी व अधळा नद्यांवरील धरणे भारतात की नाही?अशी जून महिन्यात स्थिती होती.पण पर्जन्य राजाच्या धुंवाधार बॅटिंग मुळे ही धरणे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.तर निळवंडे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आढळा नदीवर देवठाण येथे बांधण्यात आलेले आढळा धरण आज (दि.२३)रविवार रोजी दुपारी १२ वाजेेेच्या दरम्यान १००% टक्के पूर्ण क्षमतेने भरले असून ओव्हर फ्लो झाले आहे.सध्या धरणाच्या ओपन चॅनेल पध्दतीच्या सांडव्यावरून अंदाजे १०० क्युसेक्स इतका  विसर्ग आढळा नदीमध्ये सुरू असल्याची माहिती आढळा धरणाचे काही वर्षें सिंचन व्यवस्थापनाचे काम सांभाळलेले जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता इंजि.हरिश्चंद्र चकोर यांनी दिली

आढळा धरणाची एकूण साठवण क्षमता १०६० द.ल.घ.फूट(१.०६० टीएमसी) इतकी असून मृतसाठा ८५ द.ल.घ.फूट इतका आहे.तर उपयुक्त पाणीसाठा ९७५ द.ल.घ.फूट इतका आहे. या धरणाची लांबी सुमारे ६२३ मीटर इतकी असून धरणाची उंची ४० मीटर इतकी आहे.आढळा धरण हे माती धरण प्रकारातील आहे.धरणाचा सांडवा हा ओपन चॅनेल पद्धतीचा आहे. सांडव्याची विसर्ग वहन क्षमता सुमारे ५४,९००क्युसेक्स इतकी आहे. आढळा धरणाचे काम हे सन१९६० मध्ये सुरू करण्यात आले होते. पण वेळोवेळी त्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे धरण सन १९७६मध्ये पूर्ण झाले.आतापर्यंत आढळा धरण २५ वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे.  या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र सुमारे २४२२ हेक्टर आहे. काही प्रमाणात खरीप हंगामात व मुख्यत्वे रब्बी हंगामात नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सहा(६) गावांना, संगमनेर तालुक्यातील सात (७)गावांना व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील दोन(२) गावांना या धरणाच्या पाण्याचा शेतीचे सिंचनासाठी उपयोग होतो.                                                                            

तसेच या धरणांमधून अकोले तालुक्यातील देवठाण, हिवरगाव आंबरे, वीरगाव ,पिंपळगाव निपाणी ,गणोरे व डोंगरगाव या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाच गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखील राबविण्यात आलेली आहे. धरणाच्या जलाशयातून जलसंपदा विभागाने  शेतकऱ्यांना उपसा जलसिंचन योजनांसाठी देखील परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.                                                

या धरणाचा  डावा कालवा हा ८.८० कि.मी. लांबीचा व ४२ क्युसेक्स वहन क्षमतेचा आहे. त्याद्वारे सिन्नर तालुक्यातील कासारवाडी व नळवाडी या दोन(२) गावांना व अकोले तालुक्यातील डोंगरगाव (१) व तसेच संगमनेर तालुक्यातील चिकणी,निमगाव  भोजापूर , जवळेकडलग,राजापूर या चार (४)गावांना शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.तसेच या धरणाचा उजवा कालवा हा ११.८०किलोमीटर व ६८ क्युसेक्स वहन क्षमतेचा आहे. त्याद्वारे अकोले तालुक्यातील देवठाण, हिवरगाव आंबरे, वीरगाव, पिंपळगाव निपाणी ,व गणोरे या पांच( ५) गावांना व तसेच संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा, जवळेकडलग व धांदरफळ या चार(४) गावांना शेती सिंचनासाठी पाणी पोहोचविले जाते.                           

इंजि हरिश्चंद्र चकोर यांनी सांगितले की,या धरणाच्या खालील बाजूस आढळा नदीवर सुमारे सात ते आठ(७ते८) के टी वेअर्स, कॉंक्रीट बंधारे बांधण्यात आलेले आहेत. धरण ओवरफ्लो झाल्यास हे सर्व बंधारे भरले जातात व या बंधाऱ्यातील पाण्याचा

उपयोग रब्बी हंगामात शेतीच्या सिंचनासाठी उपयोग होत असल्याने शेती उत्पादनात मोठी वाढ होते व त्यामुळे शेतकरी  समाधानी होत असल्याचे दिसून आले आहे.      

महत्त्वाचे म्हणजे आढळा नदीचा उगम हा सह्याद्रीच्या डोंगरामधून बिताका परिसराच्या मधून होतो. त्या ठिकाणी दर वर्षी अतिवृष्टी होते व घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते. हे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी बिताका वळण योजनेच्या माध्यमातून आढळा खोऱ्यात वळविल्यास आढळा धरण पावसाळ्यात निश्‍चितपणे लवकर भरून ओव्हर फ्लो होऊ शकते. आणि धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर धरणाच्या खालील बाजूस आढळा नदी वर  बांधण्यात आलेले सर्व के.टी.वेअर्स, कॉंक्रीट बंधारे पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले जाऊ शकतात व त्या द्वारे रब्बी हंगामामध्ये नदीकाठच्या गावांना सिंचनासाठी निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी बिताका पाणी वळण योजना अत्यंत महत्त्वाची आहे.  या बाबतची मागणी सुमारे १० वर्षांपासून शेतकऱ्यां कडून करण्यात येत आहे. तदनुषंगाने पाच-सहा वर्षांपूर्वी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी यासाठी प्रयत्नदेखील केले होते. तथापि सद्यस्थितीत ही मागणी मागे पडल्याचे  दिसून येत आहे.

पत्रकार: डी. के. वैद्य

See latest Marathi News

Web Title: Adhala Dam Akole overflow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here