Breaking News | Ahmednagar: पाऊस व वादळी वाऱ्यापासून बचावासाठी विहिरीच्या बाजूच्या दगडांच्या अडोशाला बसलेल्या युवकाच्या अंगावर दगड कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
शेवगाव: पाऊस व वादळी वाऱ्यापासून बचावासाठी विहिरीच्या बाजूच्या दगडांच्या अडोशाला बसलेल्या युवकाच्या अंगावर दगड कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील लखमापुरी भागात बुधवारी (दि. २४) सायंकाळी घडली.
संदीप लहु खंडागळे (३०, रा. इंदिरानगर, बोधेगाव, ता. शेवगाव) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथील भारत भगवान गावंडे यांच्या विहिरीवर सिमेंट रिंगच्या कामांसाठी बोधेगाव येथील संदीप लहू खंडागळे, राहुल भिमा कांबळे, सुभाष उत्तम वैरागळ आणि प्रविण रमेश खरात हे चार तरुण गेले होते. काम सुरू असताना दुपारी साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. यापासून बचाव करण्यासाठी यातील तीन तरुण झाडखाली गेले तर विहिरीच्या लगत असलेल्या दगडांच्या ढिगाच्या आडोशाला संदीप लहू खंडागळे हा बसला होता. वारा जोरात असल्याने ढिगाऱ्याच्या वरील दगड संदीप याच्या अंगावर कोसळल्याने त्याखाली तो गाडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती पोलीस फौजदार दरम्यान घटनेची मिळताच बोधेगाव दूरक्षेत्राचे सहाय्यक नानासाहेब गर्जे, स्वयंसेवक व तरुणांना घेऊन घटनास्थळी काही मिनिटांत पोहचले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने संदीप खंडागळे याचा मृतदेह जेसीबीच्या साह्याने बाहेर काढला.
दरम्यान शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे, पोलीस निरिक्षक दिगंबर भदाणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. मयत संदीप खंडागळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगावच्या ग्रामिण रुग्णालयात पाठवला आहे. मयत संदीप खंडागळे याच्या पश्चात पत्नी, एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी आहे. त्याच्या अपघाती निधनाने संपूर्ण बोधेगाववर शोककळा पसरली आहे.
Web Title: stone fell on the youth and killed him
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study